पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. दि. 2 ऑगस्टपासून हे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
यावेळी करोना प्रतिबंध नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागच्या वर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. एक वर्षांपासून मुले घरी बसल्याने त्यांच्या शारीरिक, मानसिक दुष्परिणामदेखील झाले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववी आणि अकरावी हा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी करोनामुक्त भागात शाळा सुरू करण्याची आणि आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.
करोनामुक्त गावच्या ग्रामपंचायतीने पालकांशी चर्चा करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी एक महिना गावात करोनाचा रुग्ण आढळला नसावा. आश्रमशाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी लसीकरणाचा किमान एक डोस तरी पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
…तर शिक्षक विनावेतन रजेवर
याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर 15 दिवसांच्या आत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचा किमान एक डोस घ्यावा. असे न केल्यास त्यांना विनावेतन रजेवर पाठवण्यात येणार आहे. लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना शाळेत रुजू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची इमारत, सर्व खोल्या, बॅंच, टेबल, खुर्ची, स्टाफ रूम निर्जंतूक करावी. विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा बाहेरील नळावर हातपाय धुवून, तोंडाला मास्क लावून, हात निर्जंतूक करून प्रवेश देण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.