श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आजही अशोक कारखान्याला ऊस पुरवठा करण्याच्या मानसिकतेत आहे. परंतु सातत्याने कमी मिळणारा दर आणि ऊसाची होणारी हेळसांड यामुळे आपला शेती धंदा वाचविण्यासाठी शिकलेला तरुण शेतकरी इतर पर्याय शोधताना दिसत आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ५०० रुपये कमी भाव देताना शेतकऱ्यांनी ‘अशोक’ लाच ऊस घालावा, ही अपेक्षा कितपत योग्य आहे? असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात भोसले म्हटले की, आम्ही अशोक सहकारी साखर कारखान्यावर नितांत प्रेम करणारे आहोत. सहकारात एकमेव चार्टर्ड अकाऊंटंट लाभलेल्या नेतृत्वात कर्जाच्या खाईत बुडालेल्या ‘अशोक’ची वाटचाल अधोगतीकडे होताना दिसत आहे. या नेतृत्वाने ३१२ कोटींचे कर्ज आणि २६२ कोटींचे देणे सभासदांच्या माथी मारले आहे. मागील एकाच अहवाल सालात झालेल्या २८ कोटीच्या संचित तोट्याची जबाबदारी कोणाची? इतर चांगल्या कारखान्यांना एक क्विंटल साखर बनवायला १६०४ रुपये खर्च येतो मग तुम्हाला २७७० रुपये कसा? सभासदांना उच्च भावाचे आमिष दाखवून मोठमोठे प्रकल्प उभे केले त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय झाला ? अतिशय मेहनतीने उभ्या केलेल्या पिकाला रास्त भाव मिळावा, तेवढीच अपेक्षा शेतकऱ्यांची असताना प्रवरा कारखाना नाही तर आम्ही किमान गणेश इतका दर मागत होतो, तो का दिलेला नाही? कामगारांचे ९ महिन्यापासून थकलेले पगार कधी देणार? त्यांचे नावावर काढलेले कर्जाला जबाबदार कोण हेही प्रशासनाने सांगावे .अतिरिक्त २०० कोटी कर्ज घेतले असल्याचे शेरा ऑडीट मेमोमध्ये आहे. त्याची परतफेड करताना ‘अशोक’ला प्रती क्विंटल साखरेमागे किमान ७०० रु. फेडावे लागणार आहेत.
त्यामुळे दर किती व कसा देणार हे जाहीर करावे. आम्ही ऊस ‘अशोक’ लाच देऊ. कारण अशोक आमच्या पूर्वजांनी ऊभा केलेला आहे. शिळ्या कढीला उत आणताना अशोक बंधारे व पाण्यासाठीच्या संघर्षाची आठवण करून देताना अशोक बंधाऱ्यांची मालकी व त्यांची सध्याची परिस्थिती यावरही चर्चा करणे अपेक्षित आहे. जर अशोक बंधा-यांमुळे ऊस शेती वाढली असेल तर आज अशोक बंधाऱ्यांची दुरावस्था का? भानुदास मुरकुटे यांनी सत्तेत असताना त्यांच्या आमदारकीच्या काळात केलेली फसवे आंदोलने शेतकरी विसरलेले नाहीत. भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुरेश ताके यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
१९८८ नंतर भंडारदरा धरण सातत्याने भरायला लागले. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावामुळे शेतीचे सिंचनाचे व पिण्याचे पाण्याचे आवर्तन एकत्र व नियमित व्हायला लागले म्हणून कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढली हेही महत्त्वाचे आहे. गोदावरी व प्रवरा नदीवरील बंधारे पुलोद काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री स्व. गोविंदराव आदिकांनी मंजूर करून त्यावर निधी मंजूर करून ठेवला होता म्हणून झाले त्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये. कारखान्याच्या या परिस्थितीला कारखान्याचे सूत्रधार व नाकर्ते संचालक मंडळ कारणीभूत असल्याने इतरांवर अथवा शेतकऱ्यांवर खापर फोडण्याचे काहीही कारण नाही,असेही स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी ठणकावले.