नांदेड : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलने झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता” असा घणाघात संभाजीराजेंनी केला.
अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली.
प्रकाश आंबेडकर आमच्या आंदोलनात आले, त्यांचे कौतुक …! गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही तुमची भूमिका. देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. हेच या सरकारने सांगितले त्यामुळे शोषित वंचितांना आरक्षण मिळालेच पाहिजे , असे संभाजीराजे म्हणाले.