अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ -अशोक चव्हाण

मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने आज बुधवारी सन २०१९-२० या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.

हा अर्थसंकल्प सर्व वर्गांना निराश करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील अर्थसंकल्प2019-20 वर टीका करत अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचे म्हटले आहे.

“दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे”, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प निराशा करणारा असून निवडणुकीच्या तोंडावर फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. मागच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही”.

“शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दुष्काळी मदत याबाबत या अर्थसंकल्पात सरकारकडून काही ठोस कृती केली जाईल व आपल्याला मदत मिळेल अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण सरकारने त्यांची निराशा केली आहे”.

राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली दिसत नाही. योजनांच्या तरतुदींना कात्री लावली आहे. पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये या सरकारने २५ योजना जाहीर केल्या होती, कृषी वर्ष जाहीर केलं होतं. त्याची कसलीही अंमलबजावणी राज्यात झालेली दिसत नाही

“रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणाईवर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. महिला, तरूण, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांना अर्थसंकल्पातून काहीही मिळाले नसून सर्व समाज घटकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत”.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)