उड्डाणपूल, महामार्गाला जोडरस्त्यांचा विचार

वाघोलीतील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : आमदार अशोक पवार

वाघोली – शिरूर मतदार संघातील समस्या सोडविताना वाघोलीचा प्राधान्याने व स्वतंत्र विचार केला जाणार आहे. यासाठी सर्वतोपरी काम करण्याची तयारी आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविताना सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी
चर्चेला सुरुवात करण्यात आली असून विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उड्डाणपूल, महामार्गाला पर्यायी जोड रस्ते करण्याचाही विचार आहे. राज्य शासनासह केंद्र शासनाकडूनही कार्यवाही करण्यासाठी काम करणार आहोत, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी केले.

शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत अशोक पवार विजयी झाल्याने रविवारी (दि. 3) वाघोली ग्रामस्थ व विविध संघटनाच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी वाघोली परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, पीएमआरडीएकडून होणाऱ्या पाण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करून वढू येथे बुडीत बंधारा करता येईल का? किंवा इतर पर्यायाबाबत जलसंपदा विभागाशी चर्चा करून वर्षभर पाणी पुरेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वाघोलीतील कचऱ्याच्या समस्येबाबत देशातील सर्वोत्तम कचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेऊन, पाहणी करून लवकरच वाघोलीसाठी कशा प्रकारे उभारता येईल याचा प्रशासन, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी, हौसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

त्याचप्रमाणे वाघोलीचा समावेश महापालिकेमध्ये व्हावा किंवा स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी देखील गावातील आजी माजी सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पवार यांनी सांगितले. वाघोली परिसरामध्ये वाढते शहरीकरण व पोलिसांच्या अपुऱ्या पडणाऱ्या संख्येबाबत वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले.

वाघोली प्रश्‍नासंदर्भात लक्षवेधी मांडणार
वाघोलीत प्रचंड वेगाने वाढते शहरीकरण व भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आगामी अधिवेशन काळामध्ये वाघोली संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून शासनाचे याकडे लक्ष वेधण्यात येईल. वाघोलीतील प्रमुख समस्या चुटकीसरशी सुटणाऱ्या नसल्यामुळे यासाठी काही कालावधी जाणार आहे; परंतु या विभागाचा आमदार म्हणून काम करीत असताना केलेले काम भूषणावह असेल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्‍त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.