विविधा:अशोककुमार

माधव विद्वांस
हिंदी चित्रपटसृष्टीत “दादामुनी’ म्हणून ओळखले जाणारे, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, अशोककुमार यांचे आज पुण्यस्मरण. अशोककुमार यांचा जन्म बंगालमधील भागलपूर येथे 13 ऑक्‍टोबर 1911 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव कुमुदलाल कुंजलाल गांगुली असे होते. त्यांना अभिनेते अनुपकुमार (कल्याण) प्रसिद्ध गायक व अभिनेते किशोरकुमार (आभास कुमार ) हे दोन भाऊ व सतीदेवी ही बहीण होती. कोलकाता विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तथापि, चित्रपटसृष्टीत जादा रस असल्याने ते या क्षेत्रात आले.

त्यांना तंत्रज्ञ व्हायचे होते. त्यांची बहीण सतीदेवीचे लग्न मुंबईत वास्तव्य करणारे आणि चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करणारे सशधर मुखर्जी यांच्याशी झाले होते. त्यामुळे कुमुदलाल चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक बाबींमध्ये (अभिनयाची नव्हे तर) काही प्रमाणात रस घेण्यास कारणीभूत ठरले. ते कायद्याच्या परीक्षेत नापास झाले आणि परीक्षा पुन्हा होईपर्यंत काही महिने आपल्या बहिणीबरोबर राहण्यास मुंबईला आले. अर्थप्राप्ती करण्यासाठी त्यांनी आपल्या मेहुण्याला नोकरी शोधण्याची विनंती केली. सशधर मुखर्जी बॉम्बे टॉकीजच्या तांत्रिक विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्या मेहुण्याने बॉम्बे टॉकीजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम मिळवून दिले. तेथे त्यांचा चांगला जम बसला व वडिलांना त्यांनी वकिलीऐवजी येथे चांगले काम करू असे पटवून दिले. ते प्रयोगशाळेतील सहाय्यक म्हणून आनंदाने काम करत होते. तेथे त्यांनी 5 वर्षे काम केले. काम करत असताना वर्ष 1936 मध्ये बॉम्बे टॉकीजच्या “जीवन नैया’वर चित्रीकरण चालू होते. यात कुमुदलाल यांना अपघातानेच अभिनयाचे काम दिले. याच वेळी कुमुदलाल ऐवजी अशोककुमार हे नाव देण्यात आले व तेच पुढे रूढ झाले.

देविकारानीबरोबर त्यांचे अनेक चित्रपट झाले व ती एक पडद्यावरची जोडी जमून गेली. त्या दोघांची भूमिका असलेला “अछूत कन्या’ हा चित्रपटही खूप गाजला. “किस्मत’ या वर्ष 1943 मधील चित्रपटात त्यांनी प्रथमच पाकीटमारची नकारात्मक भूमिका केली. वर्ष 1953-53 मध्ये बॉम्बे टॉकीजपासून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वत:ची अशोककुमार प्रॉडक्‍शन कंपनी सुरू केली तसेच ज्युपिटर थिएटरही विकत घेतले.

अशोककुमार प्रॉडक्‍शनच्या बॅनरखाली त्यांनी “समाज’ या चित्रपटाची निर्मिती केली पण बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नाही. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात मात्र त्यांना तोटा सहन करावा लागला व त्यामुळे त्यांनी आपली चित्रपटनिर्मिती कंपनी बंद केली. वर्ष 1951 मध्ये “अफसाना’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांनी सुमारे 304 चित्रपटातून नायक तसे चरित्र अभिनेते म्हणून आपला ठसा उमटविला.सहज नैसर्गिक अभिनय हे त्यांचे कसब होते.त्यांच्या नजरेतूनच भाव उमटायचे. त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्या.

फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले. वर्ष 1999 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.