Ashok Kharat Case : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) सातत्याने नवीन माहिती आणि खुलासे समोर येत असतानाच, आता या प्रकरणात नवी खळबळ उडाली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट पत्र लिहून, या प्रकरणातील (Ashok Kharat Case) केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारातील संबंधित मंत्र्यांसह सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बिघडली असून, सत्य समोर आणण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आता कडक आणि ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला वेग मिळेल आणि प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल. यामुळे तपास यंत्रणेला महत्त्वाचे संकेत मिळतील, असा विश्वास माजी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. Ashok Kharat Case राष्ट्रपतींकडून हस्तक्षेपाची मागणी पत्रात सुबोध सावजी यांनी पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात केंद्र आणि राज्य पातळीवरील संबंधित मंत्र्यांसह सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी थेट हस्तक्षेप करावा. राष्ट्रपतींनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून न्याय सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या या पत्राने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशोक खरात प्रकरण आता केवळ एका भोंदूबाबाच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीपुरते मर्यादित न राहता, उच्चपदस्थ नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संभाव्य सहभागापर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येत आहे. सध्या एसआयटी (विशेष तपास पथक) या प्रकरणात वेगाने तपास करत आहे. खरातच्या मोबाइल डेटा, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा सखोल शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुबोध सावजी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रकरणात (Ashok Kharat Case) आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सुबोध सावजी यांच्या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्व स्तरांतून लक्ष लागले आहे.