बसपमधून आलेले आमदार वाढवणार गेहलोत यांची डोकेदुखी

जयपूर – राजस्थानातील सत्तारूढ कॉंग्रेसमधील पायलट गटापाठोपाठ बसपमधून आलेल्या आमदारांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

तरूण नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मागील वर्षी गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे राजस्थान सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, कॉंग्रेस नेतृत्वाला पायलट यांचे बंड शमवण्यात यश आले.

त्या घडामोडीला बराच काळ उलटूनही पायलट आणि त्यांच्या समर्थकांना अद्याप मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. आता अस्वस्थ झालेल्या त्या गटातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्या गटाने मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. अशात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बसपच्या आमदारांनीही मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी पुढे केली आहे. मागील वर्षीच्या पेचप्रसंगावेळी सरकारच्या पाठिशी उभे राहिल्याने ते वाचल्याची आठवणही त्यांनी गेहलोत यांना करून दिली आहे.

राजस्थानात 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारत कॉंग्रेसने सत्ता मिळवली. त्यावेळी बसपचे 6 उमेदवार विजयी झाले. त्या सर्व आमदारांनी सप्टेंबर 2019 मध्ये कॉंग्रेस प्रवेश केला. त्यातील काही जण मंत्रिपदावर दावा सांगत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.