वंचित आघाडीचा कॉंग्रेसला फटका, अशोक चव्हाणांची कबूली

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली

मुंबई – वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात कॉंग्रेस आघाडीला फटका बसला असून त्याचा 9 ते 10 जागांवर परिणाम झाला, अशी स्पष्ट कबूली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. वंचित आघाडीला कॉंग्रेस आघाडीसोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा परिणाम निवडणुकीत झाला. वंचितने भाजपाची बी-टीम म्हणूनच काम केल्याचा आरोप करतानाच त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला, असेही चव्हाण म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ला. या निवडणुकीत स्वतः अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रात कॉंग्रेसने केवळ चंद्रपूर येथील एकमेव जागा जिंकून आपले नावापुरता अस्तित्व राखले आहे. राज्यातील या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी शनिवारी मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यातील पराभवाची सर्व जबाबदारी मी घेत आहे, त्याबद्दल कोणालाही दोष देत नाही. राज्यातील कॉंग्रेस पक्षात कसलेही अंतर्गत मतभेद नाहीत.आम्ही सर्वांनी एकमतांनी निर्णय घेतलेले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्यास मी तयार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत

देशात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहेत, ते कुठेही कमी पडलेले नाहीत. पण ज्या-ज्या राज्यात कॉंग्रेसची अपेक्षित कामगिरी झालेली नाही, त्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन त्यांना नवी टीम बनवण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)