Ashok Chavan : काँग्रेसने अशोक चव्हाण समर्थक अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या अशोक चव्हाण यांनी मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘मी नाना पटोले यांना मोजत नाही, तर काँग्रेसचे येथील जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम हे गद्दार आहेत’, असेही ते म्हणाले आहेत.
चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून येईल असे वाटत होते. पण तिथे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय झाला. यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये बॅकफूटवर फेकल्या गेले. आता काँग्रेसने नांदेड येथील अशोक समर्थक नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी अर्धापूर नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्वजण अशोक चव्हाण समर्थक होते. काँग्रेसच्या या कारवाईविषयी पत्रकारांनी मंगळवारी अशोक चव्हाण यांना छेडले असता त्यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे अर्धापूर नगरपंचायत ही अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता. काँग्रेसने ही बाब ओळखून या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे.
लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी काँग्रेसविरोधात भाजपचा प्रचार केल्याचा अहवाल जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बी आर कदम यांनाच या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यानुसार, कदम यांनी ही कारवाई केली.