Ashok Chavan । राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी आता प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार कि स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावणार आहे हे येत्या काळात समजेलच. पण त्या अगोदरच महायुतीतून भाजपने आपल्या स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमके कसे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करत खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र.. Ashok Chavan ।
भाजप सदस्य नोंदणीची जिल्हा आढावा बैठक नुकतीच नांदेडमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असे स्पष्ट केले. देशासह राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू. असे स्पष्ट संकेत अशोक चव्हाण यांनी दिले. आपली ताकद शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही. असे ही अशोक चव्हाण म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोध Ashok Chavan ।
पुढे त्यांनी महत्वाच्या विषयाला हात घालत शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड मधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध आहे. जे शेतकर्यांचे मत आहे, तेच माझं मत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान यात काही पर्याय उपलब्ध आहेत का, हे पहावं लागेल असं ही खासदार अशोक चव्हाण म्हणाले. यातून काही मार्ग काढता येईल का हे बघू. याबाबत मी शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्यानंतर मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ही अशोक चव्हाण म्हणाले.