आशिष शेलारांची जीभ घसरली

मुख्यमंत्र्यांवरील टिकेचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीने घेतला समाचार
मुंबई : सीएए कायदा लागू न करायला बापाचं राज्य आहे का? अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार आशीष शेलार यांची जीभ घसरली. त्यांनी असभ्य भाषा वापरल्याने सोमवारी राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला. शेलार यांच्या अश्‍लाघ्य टीकेचा शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाचार घेतल्यानंतर शेलार यांनी भाषेमुळे कुणाचा अपमान झाला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो, अशी दिलगिरी त्यांनी व्यक्त केली.

सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए) महाराष्ट्र लागू करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर नालासोपारा येथील कार्यक्रमात बोलताना भाजपाचे नेते, आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरली. सीएए कायदा लागू न करायला बापाचं राज्य आहे काय? असे विधान शेलार यांनी केले.

त्यांच्या या विधानाने नवा राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर तुटून पडले. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विट करून शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काळ्या मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणा-यातले नाही.

महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, असे आव्हाड यांनी ठणकावले. तर भाजपाची राजकिय संस्कृती कोणत्या स्तराला गेली आहे हे दर्शवणारे आशिष शेलार यांचे वक्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांबाबत असे विधान त्यांना शोभणारे नाही, अशी टिका कॉंग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

आशिष शेलारांची जीभ घसरली
सर्वपक्षीय टीका सुरू झाल्यानंतर शेलार यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. मी कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक किंवा एकेरी उल्लेख केला नाही. मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. ती आमची संस्कृती, प्रथा, परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे कुणाचा अपमान झाला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो, अशी दिलगिरी त्यांनी व्यक्त केली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.