‘आमचा’ मुख्यमंत्री आशिष शेलारांनी ठरवू नये -अनिल परब

मुंबई : माजी शिक्षणमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये अशी टीका परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा,असेही त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या “कर्तृत्ववान मराठा स्त्रिया” पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असे मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी शेलारांना टोला लगावला.

राज्यपालनियुक्त जागांबाबत माहिती देताना अनिल परब यांनी हा टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असे वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले होते. शेलार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या या विधानाचा रोख सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा होती.

सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयाने अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढवण्याची खेळी या निमित्ताने आशिष शेलार यांनी केली. इतकच नाही तर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिलाआहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.