पुणे – आशीष पांडे यांनी आज दिनांक 31 डिसेंबर रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू होण्यापूर्वी आशीष पांडे हे युनियन बॅंक ऑफ इंडिया मध्ये मुख्य सरव्यवस्थापक व मुख्य परिचालन अधिकारी होते.
आशीष पांडे यांची बॅंकिंग क्षेत्रातील सुमारे 24 वर्षांची व्यावसायिक कारकीर्द असून, कर्ज व्यवहार, कर्ज संनियंत्रण, कोषागार व व्यापारी बॅंकिंग, विदेशी चलन विनिमय व्यवहार व संयुक्त उपक्रम, विपणन व ग्राहक संबंध व बॅंकिंग परिचालन अशी विविध खाती व विभाग सांभाळले आहेत.
आशीष पांडे यांत्रिक अभियांत्रिकीत पदवीधर असून वित्त व विपणन विषयामधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राविण्यासह प्राप्त केली आहे. ते भारतीय बॅंकर्स संस्थेचे प्रमाणित सहयोगी असून जीवन व सर्वसाधारण विमा, म्युचुयल फण्ड्स व डिमैट परिचालन ह्या मध्ये त्यांनी राष्ट्रीय शेयर बाजाराचे प्रमाणन प्राप्त केले आहे.
त्यांनी बंगलोर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा कार्यकारी नेतृत्व विषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कोर्पोरेशन बॅंकेच्या मुंबई मधील औद्योगिक वित्त शाखेतून पांडे यांनी आपली कारकीर्द सुरू केली व गुंतवणूक व आंतरराष्ट्रीय बॅंकिंग विभागात सुद्धा काम केले.