इंग्लंड – क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ॲशेस सिरीज धोक्यात आली आहे. कारण 10 पेक्षा जास्त इंग्लंडचे क्रिकेटपटू या सिरीजमधून माघार घेण्याच्या विचारात आहेत. ऍशेस सिरीजला 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईनचे नियम अतिशय कडक आहेत. इंग्लंडचे क्रिकेटपटू 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या काळात कुटुंबासह क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या विरोधात आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अद्याप या विषयावर तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे इंग्लडचे अनेक क्रिकेटपटू टोकाचा निर्णय घेऊ शकतात.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना बांगलादेशच्या दौऱ्यातून परतल्यानंतर क्वारंटाईनचे कडक नियम पाळावे लागले होते. त्यांना सराव करण्यास किंवा रूममधून बाहेर पडण्यासही बंदी होती. विशेष म्हणजे हे सर्व क्रिकेटपटू बायोबबलमधूनच मायदेशी परतले होते.
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना कुटुंबाला दौऱ्यावर आणण्याची परवानगी आहे. मात्र, कोणता क्रिकेटपटू नंतर येणार असल्यास त्याला 14 डिसेंबरनंतरच परवानगी मिळणार आहे. त्या परिस्थितीमध्ये त्याला ख्रिसमसच्या एक दिवस आधीपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी क्वारंटाईन कालावधीमधील त्रासाचा उल्लेख केला आहे.