लंडन – कसोटी सामन्यात खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू पाहात असतो. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन यानेही असेच स्वप्न पाहिले होते. आपला वरिष्ठ सहकारी स्टीव्ह स्मिथ जायबंदी झाल्यानंतर संघात स्थान मिळविलेल्या लाबुशेनने जबाबदारीने खेळ केला. त्यामुळेच त्याच्या संघास इंग्लंडविरूद्धच्या ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अनिर्णित ठेवता आला.
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू स्मिथच्या गळा व मान याच्या मधोमध बसला. काही क्षण त्याच्या समोर अंधेरीही आली. काही वेळाने तो पुन्हा फलंदाजीस आला. मात्र दुसऱ्या डावात तो खेळू शकणार नसल्याचे निदान झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाने बारावा खेळाडू लाबुशेन याला स्मिथच्या जागी दुसऱ्या डावासाठी समावेश करण्याबाबत परवानगी मागितली. सहसा राखीव खेळाडूस फक्त क्षेत्ररक्षणाचीच संधी मिळते. मात्र पंच व सामनाधिकारी यांनी चर्चा करून त्यांची विनंती मान्य केली. कसोटी इतिहासात प्रथमच अशी संधी देण्यात आली आहे.
लाबुशेन खेळावयास आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव 3 बाद 47 असा अडचणीत सापडला होता. त्याने ट्रेव्हिस हेडच्या साथीत 85 धावांची झुंजार भागीदारी केली. त्याने 100 चेंडूंमध्ये 59 धावा करताना 8 चौकार मारले. हेडने 9 चौकारांसह नाबाद 42 धावा केल्या. लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने मॅथ्यु वेड (1) व कर्णधार टीम पेन (4) यांच्याही विकेट्स गमाविल्या. 47.3 षटकांनंतर सामना अनिर्णित म्हणून खेळ थांबविण्यात आला. विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने 6 बाद 154 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : पहिला डाव 258 (रोरी बर्न्स 53, जॉनी बेअरस्टो 53, जोश हॅझेलवुड 3-58, पॅट कमिन्स 3-61, नॅथन लायन 3-68) व दुसरा डाव 5 बाद 258 घोषित (वेन स्टोक्स नाबाद 115, कमिन्स 3-35)
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव 250 (स्टीव्ह स्मिथ 92, स्टुअर्ट ब्रॉड 4-65, ख्रिस व्होक्स 3-61) व दुसरा डाव : 6 बाद 154 ( मार्नस लाबुशेन 59, जोफ्रा आर्चर 3-32, जॅक लीच 3-37)