कोंढवा (प्रतिनिधी) – भिंताडेनगर येथील दुचाकी गॅरेजला शुक्रवारी (दि.7) रात्री 11 च्या सुमारास आग लागली. यामध्ये 16 दुचाकी व एक लाकडी कपाट जळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उंड्री भिंताडेनगर येथील सचिन शिंदे यांच्या गॅरेजला ही आग लागली. स्थानिक नागरिक राजेंद्र भिंताडे व त्यांच्या मित्रांनी अग्निशमन दल व कोंढवा पोलिसांना याची माहिती कळविली. गॅरेजमध्ये ऑईल व पेट्रोल सांडलेले असल्यामुळे आग पसरत होती. यामध्ये 16 दुचाकी व एक लाकडी कपाट जळून खाक झाले.
बाजूलाच चारचाकी गाड्यांच्या गॅरेजला आग लागली असती. अग्निशमक दलाचे जवान वेळेवर पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बर्गे व डी. सी. वाळके करीत आहेत.