शहर परिसरात संचारबंदी लागू
प्रा. अशोक डोळ /पंढरपूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा न भरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, पालखीची परंपरा जपण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या नऊ मानाच्या पालख्या “विठाई’ बसने रात्री 8 वाजता वाखरी (ता.पंढरपूर) येथील पालखी मैदानावर दाखल झाल्या. येथे या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या. पंढरीतही रांगोळ्या रेखाटून उत्साहात स्वागत करण्यात आले.
वाखरी पाळखी तळावर पालख्या दाखल होताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, नगराध्यक्षा साधना भोसले, वाखरीच्या सरपंच मथुरा मदने, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी स्वागत केले. बुधवारी (दि. 1) पहाटे पाच वाजेनंतर मानाच्या पालख्यांना स्नानासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर पंढरपुरात करोनाचे नऊ रुग्ण आढळून आल्याने व करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरात संचारवंदी लागू करण्यात आली असल्याने नागरिकांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिकेसह पादुकांवरोवर मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
पादुकांसमवेत स्थानिक 10 मठाधिपतींना नैवेद्य दाखवण्याचा मान मिळाला असून नैवेद्य दावण्यासाठी प्रत्येकी दोन मानकऱ्यांनाप्रवेश देण्यात येणार आहे. तर गुरुवारी (दि. 2) सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रुक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पालख्याचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होणार आहेत. यात्रा यशस्वीरित्या पार पाहण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
1500 पोलिसांचा फौजफाटा
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये करोनाचा संसर्ग उद्भवू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त असून याकरीता 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.
मानाच्या पालख्या
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (श्रीक्षेत्र आळंदी), श्री संत तुकाराम महाराज संस्थान (श्रीक्षेत्र देहू), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान (श्रीक्षेत्र सासवड), श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर), श्री संत मुक्ताबाई संस्थान (श्रीक्षेत्र मुक्ताईनगर, जि. जळगाव), श्री संत एकनाथ महाराज संस्थान (श्रीक्षेत्र पैठण, जि. औरंगाबाद), श्री संत नामदेव महाराज संस्थान (श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर), श्री विठ्ठल रूखमाई संस्थान (श्रीक्षेत्र कौंडण्यपूर, जि. अमरावती), श्री चांगावटेश्वर देवस्थान (श्रीक्षेत्र सासवड).
यंदा विठ्ठल वडे यांना पूजेचा मान
एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. 1) पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडणार आहे. त्यांच्या समवेत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले मानाचे वारकरी विठ्ठल ज्ञानदेव वडे हे ही सपत्नीक पुजेसाठी उपस्थित असणार आहेत.