वाल्हे (पुणे) – मागील वर्षी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व जनता घरात बसलेली असतानाच, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक स्वतःचा आणि त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा जीव धोक्यात घालून, उन्हातान्हात घरोघर फिरून सर्वेक्षणाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत; मात्र किमान वेतनही वेळेत मिळत नसून राज्य शासनाने घोषित केलेली रक्कमही अद्याप मिळाली नसल्याने त्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, या कामाचे देखील शासनाकडून दिवसाला केवळ 25 रुपये दिले जातात. शासनाच्या मते आशा स्वयंसेविकांच्या जिवाची किमंत फक्त 25 रुपये लावून शासन आमची थट्टा करीत असल्याचे आशासेविका, गटप्रवर्तकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील आणि नागरी भागातील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा सर्व्हे, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारीचा’ सर्वेक्षणासाठी विशेष भत्ता 300 रुपये प्रतिदिन द्यावा, असे निवेदन वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांना दिले आहे. यावेळी आशा स्वयंसेविका रोहिणी पवार, सविता दुर्गाडे, ज्योती पवार, नलिनी पवार, अलका नलवडे, वैशाली दानवले, ज्योती म्हागंरे, वैशाली माळवदकर आदी उपस्थित होत्या.
“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, जिल्हा समूह संघटक हे दररोज स्थानिक पातळीवर काम करणारे कामगार आहेत. यातील अनेक जण त्यांय्चा कुटुंबासह पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात बेड मिळत नाहीत. नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या या कामगारांना खासगी रुग्णालयातील भरमसाठ बील भरणे शक्य नाही. यासाठी शासनाने सर्वच फ्रंटलाइन कामगारांसाठी स्वतंत्र बिलाची व्यवस्था करण्यात यावी. किंवा सर्वांचीच मेडिक्लेम पॉलिसी काढून त्याद्वारे उपचार करावेत.
– निलेश दातखिळे( संघटक सचिव, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र)
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लाभार्थी 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना व 45 ते 60 वयोगटांतील रक्तदाब अन्य आजार असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी लाभार्थीची यादी तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यापासून दररोज सकाळी 10 ते 6 या वेळेत आशासेविका लसीकरण केंद्रावर काम करीत आहेत . मात्र, या सगळ्या कामाचा मोबदला म्हणून 1 रूपया देखील मानधन शासनाकडून अद्याप दिले नाही. पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत एकूण 3119 आशा स्वयंसेविका तसेच पुणे जिल्ह्यात गटप्रवर्तक 154 कार्यरत आहेत, अशी माहिती, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या, पुणे जिल्हा अध्यक्षा जयश्री धायबर, उपाध्यक्षा आरती घुमे, संघटक सचिव निलेश दातखिळे, व कार्याध्यक्ष शुभांगी जगताप यांनी दिली.
“करोनाबाधित, बाधितांच्या संपर्कातील हाय, लो रिक्स लोकांची यादी तयार करून त्या सर्वांना होमक्वारंटाइन राहण्यास सांगणे; त्या परिसरातील कन्टेंनमेंट झोनमधील सर्वेक्षण करणे आदी सगळे काम स्वतःच्या जीव धोक्यात घालून आशासेविका करीत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करीत आहोत.
– वैशाली दानवले( गटप्रवर्तक)
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, आशा सेविका मागील वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना सर्व्हेक्षण करतानाही खूप अडचणी येतात. अनेक नागरिक भेदभावाची वागणूक देतात. तर तुम्ही आमच्या घरी नका येत जाऊ; तुम्ही गावभर फिरता, त्यामुळे आम्हाला तुमच्यामुळे करोना होईल, असे बोल काही नागरिकांकडून ऐकून घ्यावे लागतात, हे बोलणे मनाला फार लागतत, असेही अशासेविकांचे म्हणणे आहे.
“स्वत:चा जीव धोक्यात घालून संसर्गाच्या काळात रोज अनेक कुटुंबांना भेटी दिल्या जात होत्या. संसर्ग रोखण्यात आशा सेविकांचे योगदान होते. समाजासाठी गरजेच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल आत्तातरी शासनाने घ्यावी; स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम आम्ही प्रामाणिकपणे करीत आहोत. आम्हाला यासाठी शासनाने सुविधा व मानधन लवकर वाढवावे.
– रोहिणी पवार( आशासेविका वाल्हे)
शासनाचा जीआर, पत्र नाही
ग्रामीण भागात काम करणार्या आशा स्वयंसेविकेला ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षणासह त्याचा डाटा मागितला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागीलवर्षी एप्रिल महिन्यात आशा स्वयंसेविकेला प्रवास भत्ता एक हजार आणि मानधन एक हजार दिले गेले होते; मात्र यानंतर ग्रामपंचायतीकडून देखील कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आले नसून, यासंदर्भात मागणी केली असता, शासनाकडून तसा जीआर, किंवा कोणतेही पत्र आले नसल्याचे सांगण्यात येते.
तालुका, आशा स्वयंसेविका ,गटप्रवर्तक
पुरंदर, 152, 6
मुळशी, 119, 7
भोर,145, 8
आंबेगाव, 226, 15
खेड,228, 17
जुन्नर,323, 23
मावळ,168, 8
वेल्हा,47, 3
हवेली 322 18
दौंड,278, 13
शिरूर,240, 13
बारामती,250, 9
इंदापूर,280, 14
पुणे 200 तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 141 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत.