सोलापूर – करोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत घराघरात जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी आजपासून काळ्या फिती लावून काम केले. सुरक्षा आणि वाढीव मोबदला मिळावा यासाठी आशा स्वयंसेविकांनी हे आंदोलन सुरु केले आहे.
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे पुकारण्यात आले आहे. 13 मे पर्यंत काम करत असताना हातावर काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न आशा स्वयंसेवक करत आहेत. करोनाच्या काळात घराघरात जाऊन सर्व्हेक्षण करणे व यासारखी अनेक काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करत आहेत.
मात्र त्यांना मोबदला म्हणून अत्यंत तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याचा आरोप आशा स्वयंसेविकांनी केला. स्वत:सह कुटुंबियांचे जीव धोक्यात घालून काम करत असताना कित्येक वेळा लोकांकाडून चुकीची वागणूक मिळते. अनेकांचे पती किंवा घरातील मंडळी मोलमजूरी करत काम करतात.
लॉकडॉऊनमुळे त्यांची कामे बंद आहेत. अशात संसाराचा गाडा हाकण्यासाठी मानधन न देता महिन्याकाठी ठराविक रक्कम देण्यात यावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा सरंक्षण देण्यात यावे, अशी मागणी आशा स्वयंसेवकांनी केली आहे.