तारूण्य फेसऍपच्या भुरळीत म्हातारे होताना…

आता युद्ध खऱ्या अर्थाने रणसंग्रामावर होणार नाही तर ते होईल भारताच्या लोकसंख्या लाभांशासोबत! कारण, जागतिक स्पर्धेमध्ये भारत सध्या सर्वात युवा देश आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. यातून सगळी आर्थिक गणिते मांडली जातात. या गणितातून तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक कल्पनांची निर्मिती करीत तरूणाईस गळाला लावले जात आहे.

याच प्रकारातील एक नाव म्हणजे फेसऍप होय. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा सध्याचा काळ आहे. तंत्रज्ञानाचे फायदे – तोटे हे पूर्णपणे आपण ते कसे वापरतो यावरती अवलंबून असतात. या तंत्रज्ञाच्या प्रगतीला सामोरे कसे जायचे हे पण आपण लक्षात घेणे आवश्‍यक आहे. फेसऍपने सध्या सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. या ऍपच्या मदतीने प्रत्येकाला म्हातारे होण्यात धन्यता वाटत आहे. आपल्याला मिळालेल्या मौल्यवान आयुष्याला न्याय द्यायचे सोडून अगणित जनता स्वत:च्या म्हातारपणाच्या प्रेमात पडत आहे.

आभासी जगामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यात जाणारा सरासरी वेळ जर आपण वास्तव जीवनात सत्कारणी लावला तर नक्कीच काहीतरी भरीव कामगिरी करता येईल. अन्यथा काल टिकटॉक आज फेसऍप आणि येणाऱ्या काळानुरूप आणखी काहीतरी आपल्यासमोर असेल. फेसऍपने रशियात अब्जावधी रूपये कमविले! आणि आपण इकडे म्हातारे होण्यात अधिक धन्यता मानत आहोत. कोणी काय वापरावे, हा जरी वैयक्तिक प्रश्‍न असला तरी यामध्ये आपल्या माहितीची सुरक्षितता आणि खाजगीपणा जपणे आवश्‍यक ठरते. फेसऍप वापरताना आपल्या माहितीच्या सुरक्षिततेबद्दल अनेक तज्ञांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत.फेसऍपची निर्मिती करणारा यारोस्लेव हा केवळ आपल्या बारा सहकाऱ्यांसोबत रशियात बसून काम करतोय.

या बारा जणांच्या चमूने आज संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावले आहे. अँड्रॉइड आणि आयफोनवरती गेल्या आठवड्यात सर्वाधिक फेसऍप डाउनलोड केले गेले. म्हातारे होणे वाईट नाहीये! मात्र, लहानांना मोठे अन्‌ मोठ्यांना पुन्हा लहान व्हावेसे वाटण्याचा काळ संपला की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. आपल्याला असेच आभासी जगाच्या रणांगणात गुंतवून धारातीर्थी पाडले जाणार आहे! त्यामुळे अधिक जागरूक राहात आपण या युद्धजन्य स्थितीचा भाग न बनता आपली निसर्गत: उत्स्फूर्तता जपावी, एवढेच.

 

 

 

 

श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)