महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची धडक: रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
पुणे – परीक्षेसाठी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो ट्रॅव्हलर अचानक वळताना धडक बसली. या अपघातात विद्यार्थिनीच्या डोक्याला व छातीस गंभीर दुखापत झाली होती. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताच्या निषेधार्थ मुलीच्या नातेवाईकांनी आणि “एनएसयुआय’ संघटनेच्यावतीने महाविद्यालयासमोर आंदोलन केले.
ही घटना 21 नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजता कोंढव्यातील इस्कॉन मंदिराजवळील “व्हिआयआयटी’ महाविद्यालयाजवळ घडली. ऐश्वर्या संतोष धांडेकर (वय 19, कोंढवा-सासवड रोड, कोंढवा बुद्रुक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती “बीसीए’च्या दुसऱ्या वर्षात शिकते. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सदाशिव गुजले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बसचालक निखिल वानखेडे (रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही कोंढवा येथील विश्वकर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. 21 नोव्हेंबरला परीक्षा असल्याने ती दुपारी साडेबारा वाजता महाविद्यालयामध्ये पायी जात होती. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमधून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 11 बीएल 9490) चालकाने गाडी अचानक वळविली. त्यावेळी बसच्या डाव्या बाजुची ऐश्वर्याला धडक बसली. त्यामध्ये गंभीर जखमी झाली, मात्र चालकाने तिला रुग्णालयात न नेता तेथून पळ काढला. मात्र, नागरिकांनी तिला तातडीने भारती रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. ही बस खासगी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचवण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.