पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापोलकेच्या प्रभागांची संख्या 128 वरून 139 वर पोहोचणार आहे.
त्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळणार असल्याने शहरातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभागांची संख्या वाढणार असल्याने आता नव्याने प्रभाग आखणी करावी लागणार असून त्याकडे लक्ष ठेऊन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे.
प्रभागांची संख्या वाढल्याने आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम नव्याने राबवावा लागणार असून या आखणीदरम्यान अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभाव क्षेत्राला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. त्यनुसार गेल्या दहा वर्षांत नव्याने नागरी वस्ती वाढलेल्या चऱ्होली, दिघी, मोशी, रावेत, पिंपळे गुरव या भागांत प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता प्रभागांची आखणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आता जोरदार तयारी सुरु केली आहे. वाढदिवसानिमित्त स्वत:ला लॉंच करण्यासाठी सर्वत्रच चढाओढ लागली आहे. प्रत्येक सोसायटीचे प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक व महत्वाची ठिकाणे या इच्छुकांच्या हसऱ्या चेहऱ्यांच्या फलकांनी बळकाविली आहेत.
यापूर्वी कधीही नाव न ऐकलेल्या नवख्या इच्छुकांनीदेखील स्थानिक इच्छुकांना मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्याकरिता किल्ले बनवा स्पर्धा, दिवाळी फेस्टीव्हल, हाफपीच क्रिकेट स्पर्धांमधून संभाव्य मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
अनेकांच्या फलकावरुन पक्षाचे चिन्ह गायब
निवडणुकीबाबतच्या हालचाली सुरू झाल्याने दिवाळीच्या निमित्ताने इच्छुकांना स्वत:च्या सादरीकरणाची आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे या त्यांच्याकडून प्रमाणावर फलकबाजी सुरू करण्यात आली आहे. तर पक्ष बदलाच्या तयारीत असलेले अनेक विद्यमान नगरसेवक व तिकीटाची खात्री नसलेल्या इच्छुकांकडून राजकीय पक्षांची चिन्हे टाळली जात आहेत. वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे चिन्ह टाळून फलकांद्वारे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू आहे.
इच्छुकांमध्ये हवशे, गवशे आणि नवशेदेखील
एखाद्या राजकीय पुढाऱ्याशी असलेली किरकोळ ओळखदेखील आता इच्छुकांना उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने महत्वाची वाटत आहे. आपल्यावर राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीचे छायाचित्र आपल्या फलकावर आवर्जून छापले जात आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राजकीय वाटचालीची ते पूर्वकल्पना देत आहेत.