पुणे -पुणे शहरात कोविड-19 रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी तपासणीसाठी घेतलेल्या एकूण सॅम्पल्सपैकी साधारण 3.9 टक्के केसेस पॉझिटिव्ह, तर साधारण 89 टक्के केसेस निगेटिव्ह आहेत. मृत पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी साधारणपणे 80 टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय यातील बहुतांश व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब हा विकार दिसून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दि.5 ते 31 मार्च 2020 या कालावधीत 1 हजार 235 सॅम्पल्स घेण्यात आले होते. यापैकी 48 पॉझिटिव्ह तर 1 हजार 110 सॅम्पल्स निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे तपासणी करण्यात आलेल्या एकूण सॅम्पल्सपैकी साधारण 3.9 टक्के सॅम्पल्स पॉझिटिव्ह, तर 89 टक्के सॅम्पल्स निगेटिव्ह आले आहेत. मार्चच्या तुलनेत 1 एप्रिल ते 8 एप्रिलदरम्यान साधारणपणे चार पट जास्त सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. या कालावधीत पॉझिटिव्ह केसेसची संख्या ही झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. तपासणीदरम्यान पॉझिटिव्ह केसेस जास्त आढळून आल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.