काठमांडू : नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) पक्षाचे प्रमुख के.पी. शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. शेर बहादुर देऊबा यांच्या नेपाळी कॉंग्रेसबरोबरच्या नवीन आघाडी सरकारचे ते नेतृत्व करणार आहेत.
माओवादी सेंटरचे प्रमुख प्रचंड यांनी मांडलेला विश्वास दर्शक ठराव संसदेत मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे प्रचंड यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर ओली यांना सरकार स्थापन करण्यास अध्यक्ष राम चंद्र पौडेल यांनी पाचारण केले होते.
उद्या सकाळी ११ वाजता के.पी. शर्मा ओली यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे. त्यांच्या समवेत १८ सदस्यांच्या मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ओली सरकारपुढे देशातील राजकीय अस्थिरता संपवण्याचे मोठे अवघड आव्हान असणार आहे.