सोनई – करोनाचा महामारी दोन वर्षांपासून असल्याने भाविक शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी येत नव्हते. दरम्यान शनिवारी लाखो भाविकांनी दिवसभर शनिदर्शनासाठी रांगा लावून दर्शन केले. या गर्दीने मंदिर परिसर गजबल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनी देवकी जय, शनि महाराज की जय, जय शनिदेव या जयघोषात मंदिर परिसर दणाणून गेला होता.
राज्यातून, जिल्ह्यातून, परिसरातील भाविकांनी दिवसभर शनिदर्शनसाठी मोठी गर्दी केली होती. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच दुसरा शनिवार, रविवार सुट्टीमुळेच गर्दीचा उच्चांक पाहावयास मिळला.
दर्शनरांगेतील भाविकांना दर्शनसाठी तासनतास रांगेत उभे राहून वेळ लागत होता. देवस्थान ट्रस्टने दर्शन व्हावे, यासाठी उपाययोजना केल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांनी शनिचौथरा ते प्रवेशद्वार अंतरापर्यंत रांग गेली होती. एस टी महामंडळाचा संप मिटला असता तर अजून गर्दीत भर पडली असती. भाविक जे वाहन मिळेल त्या वाहनाने शनिशिंगणापूरात दाखल झाले होते.
व्यापारी सुखावले
कारोनाच्या संकटामुळे भाविकांनी शनिशिंगणापूरात पाठ फिरवली होती,मात्र काल पहाटेपासून दिवसभर लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात जिकडे पाहावे तिकडे भाविक दिसत होते. त्यामुळे व्यापारीवर्गही सुखावला आहे. आता करोनाचा बॅकलॉग भरून निघेल, असा संवादही ऐकायला मिळाला.
यावेळी सकाळपासून अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे गर्दीवर लक्ष देऊन होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करत होते. शिंगणापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शनिदर्शन झाल्यानंतर भाविकांनी घरी प्रसाद नेण्यासाठी शनीचा प्रसाद बर्फी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी केली.