राज्यात सत्तेच्या गणितेची समीकरणे पूर्णपणे बदलली. शिवसेनेला खिंडार पाडत शिंदे गटासोबत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने महापालिकांसाठी सदस्य संख्या बदलत महाविकास आघाडीने निश्चित केलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर फुली मारत महापालिका निवडणुकांची राजकीय चित्र पालटले आहे.
त्यामुळे 2017 च्या निवडणुकांप्रमाणेच आगामी महापालिका निवडणुका 4 सदस्यांच्या प्रभागात झाल्यास तीनच्या प्रभाग रचनेमुळे महापालिकेवर झेंडा फडकविण्याची रणनिती आखलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे मनसुबे उधळले आहे. तीन सदस्यांच्या प्रभागामुळे सुपात असलेली महाविकास आघाडी जात्यात गेली असून, भाजपचा महापालिकेत सत्तेचा सोपान गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास त्याचा सरळसरळ फायदा भाजपला होणार असून भाजपचे विद्यमान नगरसेवकांसह, इतर पक्षातील आयारामांनाही प्रभाग रचनेत भाजप सोबत जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादीची मात्र चांगलीच कोंडी होणार असून चारच्या प्रभागात पक्षाला मतदान होत असल्याने तीन पक्षांचे उमेदवार चारच्या प्रभागात बसविताना महाविकास आघाडीला मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे.