मराठवाडा तहानलेलाच, तब्बल 1900 टॅंकरने पाणीपुरवठा

राज्यात 3 हजार 369 टॅंकर सुरू
मुंबई – गेल्यावर्षी पडलेला अपूरा पाऊस… त्यामुळे धरणातील घटलेली पाण्याची पातळी आणि यंदा उष्णतेच्या तापमानाचा वाढलेला पारा यामुळे मराठवाड्याच्या घशाला कोरड पडली आहे. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे मराठवाडा सर्वाधिक तहानलेला असून येथील आठही जिल्ह्यांतील नागरीकांना पाण्यासाठी तब्बल 1900 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात सद्या एकूण 3369 सरकारी व खासगी टॅंकरच्या माध्यमातून गावे, वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.

मार्च महिना अखेरीसच राज्याचे तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. अद्याप एप्रिल आणि मे हे दोन पूर्ण महिने बाकी आहेत. त्यामुळे वाढत्या तापमानाबरोबरच ग्रामीण भागातील नागरीकांना पाण्याचाही सामना करावा लागणार आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात 461 टॅंकर्सने पाणी पुरवठा केला होता. त्याच्या तुलनेत यावर्षी टॅंकर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांमधील 2629 गावे व 6317 वाड्यांना 3369 टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

या जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या आठही जिल्ह्याला पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. मराठवाड्यातील 1392 गावे व 482 वाड्यांना 1900 टॅंकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये पाणी पुरवठा करणा-या खासगी टॅंकर्सची (1822) संख्या सर्वाधिक आहे. औरंगाबादमध्ये 845, जालना 305, बीड 600, परभणीमध्ये केवळ 6, हिंगोली 20, नांदेड 43, उस्मानाबाद 71 तर लातूरमध्ये 10 टॅंकर्संनी पाणीपुरवठा केला जात आहे.

मराठावाडापाठोपाठ उत्तर महाराष्ट्राही तहानलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात सद्या 862 टॅंकर्स, तर पश्‍चिम महाराष्ट्रात 458 टॅंकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये फक्त 37 टॅंकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here