इस्लामाबाद : भारताचे शेजारी राष्ट्र असलेला पाकिस्तान कर्जाच्या बोज्याखाली पूर्णत: दबला आहे. तो देश सातत्याने कधी चीनकडून तर कधी आंतरराष्ट्रीय नाणेनीधी अर्थात आयएमएफकडून कर्ज घेतो आहे. मात्र त्या कर्जावरील व्याज भरता भरताच पाकिस्तानचा श्वास आता कोंडला जाऊ लागला आहे. आज स्थिती अशी आहे की गेल्या चाळीस वर्षांत आयएमएफच्या कर्जावरील व्याजापोटीच पाकिस्तानने आतापर्यंत ३.६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. गुरूवारी पाकिस्तानी संसदेच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीतच ही माहिती उघड झाली आहे.
द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानचे अर्थमंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की आयएमएफला आतापर्यंत साडेतीन अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्याज दिले गेले आहे. व्याजाची ही रक्कम पाकिस्तानी चलनाच्या भाषेत सांगायची झाली तर १ हजार अब्ज रूपयांपेक्षाही जास्त भरते. समितीच्या बैठकीत अशीही माहिती देण्यात आली की पाकिस्तानने गेल्या ३० वर्षांत आयएमएफकडून २९ अब्ज डॉलर रक्कम उधार घेतली आणि याच काळात २१.७२ अब्ज डॉलरची परतफेड केली.
गेल्या चार वर्षांत पुन्हा आयएमएफकडून साडेसहा अब्ज डॉलर कर्ज घेण्यात आले व त्यातील ४.५२ अब्ज डॉलर परत देण्यात आले. गेल्या चार वर्षांतच आयएमएफला १.१० अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्याजही पाकिस्तानने मोजले आहे. बैठकीत समितीचे अध्यक्ष म्हणाले की देशाचा आपोआप विनाश होत नसून आपण सगळेच त्या विनाशातील भागिदार आहोत. तसेच आता यापुढे आयएमएफसोबत होणाऱ्या प्रत्येक बैठकीची आणि कार्यक्रमाची आम्हाला माहिती दिली जावी असे सांगतानाच आतापर्यंत झालेल्या बैठकांचाही तपशील समितीने मागवला आहे. दरम्यान, पाकिस्तानला पुन्हा एकदा आयएमएफकडून ७ अब्ज डॉलर कर्ज मिळणार असून ते तीन टप्प्यात दिले जाणार आहे.