मुंबई : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया
स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मंत्रालयाच्या परिसरात राज्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण संपवून निघाले होते. तेव्हाच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी जळगावचा आहे. या शेतकऱ्याचे नाव सुनील गुजर असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रालयात ध्वजारोहण करून मुख्यमंत्री बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिस्थितीचं गांभिर्य पाहून उपस्थित पोलिसांनी त्या शेतकऱ्याला रोखलं आणि अनर्थ टळला.