नगर – कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे यांच्यावर निलंबनाची केलेली कारवाई ही नियमानुसारच झाली आहे. त्यामुळे याचा शिक्षक संघटनांनी नाहक बागुलबुवा उभा करू नये असा निर्वाळा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.
सोनवणे यांनी शाळा खर्चात दाखविलेली अनियमितता व परस्पर केलेले खर्च,विभागीय आयुक्तांच्या चौकशीत संबंधीत कागदपत्रे सादर न करणे,विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या पालकांच्या तक्रारी या मुद्यांचा विचार करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
कोपरगावच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोनवणे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सोनवणे यांनी शेख यांच्यावर केलेले आरोप व त्यांच्या समर्थनार्थ ज्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शेख यांच्यावर आरोप केले आहेत. त्याची सध्या जिल्हा परिषद पातळीवर शहानिशा केली जात आहे. त्यासाठी सदर शिक्षक नेत्यांचे जबाब घेण्याचे काम सुरु आहे. एकूण 28 शिक्षक नेत्यांचे जबाब घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शबाना शेख यांच्यावर कारवाई होणार का?
कोपरगावच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्याची शहनिशा करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र ही चौकशी निव्वळ दिखावा तर ठरणार नाही अशी भिती संबंधितांना आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची उघड भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
चौकशी म्हणजे कारवाई नव्हे
कोपरगावच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित तक्रार केलेल्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांची चौकशी सुरु केली आहे. यामुळे गुरुजींमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण आहे.
याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, शेख यांच्यावर जे आरोप आहेत त्याच्या चोैकशीचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांच्यावर शिक्षक संघटनांनी जे आरोप करत आक्षेप घेतले आहे त्याची शहानिशा करण्यासाठी 28 शिक्षक नेत्यांच्या साक्षी घेतल्या जात आहेत.यात त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न येत नाही. मात्र सदर शिक्षक नेते चुकीच्या पध्दतीने समाजात याबाबत संदेश पसरवत आहेत. चौकशी ही कारवाई नसते असा निर्वाळा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.