पुणे – सरकारच्या अखत्यारितील 10 बॅंकांचे विलीनीकरण 4 बॅंकांमध्ये करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले असून या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
रिझर्व बॅंकेने या संदर्भात म्हटले आहे की, या संदर्भातील काम व्यवस्थित झाले असून आता 4 मोठ्या बॅंका 1 एप्रिलपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत राहतील. दि. 4 मार्च रोजी केंद्र सरकारने या संदर्भातील अधिसूचना जारी केली होती. बहुतांश बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विलीनीकरणाला विरोध केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यापूर्वी आंदोलनही केले आहे. त्याचबरोबर या आठवड्यात संघटनांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून सध्याच्या परिस्थितीत हे विलीनीकरण लांबणीवर टाकण्यात यावे, असे म्हटले होते. त्यामुळे याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बॅंकांचे विलीनीकरण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रिझर्व बॅंकेने ही बाब रविवारी स्पष्ट केली.
या बॅंकांचे होणार विलीनीकरण
संबंधित निर्णयानुसार ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बॅंकेत विलीन होणार आहेत. सिंडिकेट बॅंक कॅनरा बॅंकेत विलीन होणार आहे. अलाहाबाद बॅंक इंडियन बॅंकेत विलीन होणार आहे. तर आंध्र आणि कार्पोरेशन बॅंक युनियन बॅंकेत विलीन होणार आहे.