Pimpri | पीएमआरडीएच्या सदनिकांसाठी ४,८६१ नागरिकांनी केला अर्ज

पिंपरी,- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ यापूर्वीच करण्यात आला. घर घेणा-या इच्छुकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ४ हजार ८६१ नागरिकांनी अर्ज केला आहे. त्यातील पावणेदोन हजार जणांनी अनामत रक्कम भरली आहे. आता अर्ज करण्यासाठी दोनच दिवस (शनिवार, दि. ३०) उरले आहेत.
पीएमआरडीच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी १२ ऑक्टोबरपासून नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. २८ नोव्हेंबर) दुपारी तीनपर्यंत ४ हजार ८६१ नागरिकांनी संकेतस्थळावर आपली प्राथमिक नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ७१७ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदनिकांसाठी शनिवार (दि. ३० नोव्हेंबर) पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.




