लस घेतल्यानंतर आतापर्यंत झाला तब्बल 180 जणांचा मृत्यू; वाचा सविस्तर बातमी…

निम्मे मृत्यू हृदयात आढळलेल्या ब्लॉकेजमुळे, एईएफआयचे निवेदन

नवी दिल्ली – लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांचा आढावा घेणाऱ्या राष्ट्रीय समितीने (एईएफआय) माहिती दिल्यानुसार 29 मार्च 2021 अखेर देशात लसीकरणानंतर मृत्यू झाल्याच्या 180 घटना आहेत तर 617 जणांना गंभीर स्वरुपाच्या आजारांना सामोरे जावे लागले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या लसीकरण तांत्रिक सहाय्य युनिटच्या अंतर्गत (आयटीएसयू) एईएफआयने हे विश्लेषण केले आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये असणाऱ्या अडथळ्यांमुळे झालेले आहेत.

त्यातील 70 टक्के मृत्यू हे लस घेतल्यानंतर तीनच दिवसांमध्ये झालेले आहेत. 15 टक्के मृत्यू हे पक्षाघातामुळे झालेले आहेत. एकूण 65 टक्के मृत्यू हे या दोन कारणांमुळे झाले असल्याचे विश्लेषणात दिसून आले आहे. लस घेणाऱ्या या व्यक्तींची पार्श्वभूमी माहित नसल्याने कदाचित त्यांच्या शरीरात या व्याधींनी आधीपासून घर केले असण्याची शक्यता आहे आणि लस घेणे हे फक्त निमित्त असू शकते, असे एईएफआयने म्हटले आहे.

लस घेतल्यानंतर 276 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामध्ये 200 महिला होत्या. विश्लेषणासाठी यातील अनेक रुग्णांची आजारपणाविषयीची मागील कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कच्या सहसंयोजक मालिनी असोला यांच्या मते, मृत्यूच्या कारणाचे विश्लेषण आणि अंतिम नेमके कारण स्पष्ट करण्यात एईएफआय मागे पडते आहे. 

मृत्यूचे वेळच्यावेळी विश्लेषण होऊन त्यामागील कारण स्पष्ट झाले तर लसीकरणाच्या मोहिमेत त्यानुसार योग्य त्या शिफारशी करणे शक्य होते. विशेषतः विविध वयोगट किंवा आजारपण असणाऱ्यांबाबत आधीच काळजी घेणे शक्य होते. तज्ज्ञांच्या मते एईएफआय अधिक बळकट करणे गरजेचे असून त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.