Pune News | तब्बल १२५ ढोल-ताशा पथकातील वादकांची तुळशीबाग गणपतीला मानवंदना

प्रभात वृत्तसेवा
पुणे – तब्बल १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीला वादनाच्या माध्यमातून सोमवारी अनोखी मानवंदना दिली. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल ताशांचा निनाद या वेळी तुळशीबागेत घुमला. इतिहासात प्रथमच ढोल ताशा पथकातील १२५ वादकांनी एकत्र येत बाप्पाला वादनातून वंदन केले.
स्थापनेचे शतकोत्तर रौप्य होत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन पार पडले.मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने आणि पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते झाले.
या वेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते. या वेळी अरुण भुकन यांच्या कुटुंबातर्फे श्रींच्या चरणी पालखी अर्पण करण्यात आली. ही पालखी राजस्थानमध्ये पुखराज मिस्त्री यांनी सागवान लाकडामध्ये घडवली आहे.





