जळगाव – शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांना अंधारे यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना हाणला.
महाप्रबोधन यात्रेतील दुसऱ्या टप्प्यासाठी अंधारे जळगाव जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही.
आता 'या' तारखेला समजणार खरी शिवसेना कोणाची? https://t.co/i2vZ5HARXb
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 1, 2022
पाचोऱ्यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते. बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत. लोकांना माहिती आहे, सत्ताधाऱ्यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे.