Badlapur School Girl Rape Case : बदलापूरमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले असून रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक तासांपासून रेल्वे रोको सुरू आहे. आरोपीला इथेच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकानी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पीडित मुलींनी पालकांना जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित मुलींची खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचं उघड झालं.
यानंतर पीडित मुलींचे पालक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनीही त्यांची तातडीने दखल घेतली नाही. १२ तास त्यांना रखडत ठेवण्यात आले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरदेखील कारवाई केली. तसेच या प्रकरणातील संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांच्या संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे ट्रॅकवर जात रेल रोको आंदोलन केले. आंदोलनाची धग तीव्र होत गेल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले.
चिमुरडींवरील अत्याचाराने सगळेच हादरले आहेत. मराठी अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर आपल्या स्टोरीमध्ये या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी शिवालीने केली आहे. तसेच, अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
सुरभीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून एक पोस्ट शेअर केली आहे. “बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार…एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग!!
माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित…त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाहीये…कधी अश्या आरोपींना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा होईल या देशात देव जाणे”, असं सुरभीने म्हटले आहे. सध्या या घटनेवर अनेक कलाकार संताप व्यक्त करताना दिसत आहेत.