पुणे : नवसह्याद्री क्रीडा संकूल यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या नमिश हूड, आर्यन किर्तने यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर पुण्याच्या नमिश हूडने आपला शहर सहकारी सहाव्या मानांकित स्मित उंद्रेचा 6-3, 6-3 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम राखली. पुण्याच्या बिगर मानांकित आर्यन किर्तनेने अव्वल मानांकित प्रज्ञेश शेळकेचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(1) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीनाने पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या सृष्टी सूर्यवंशीचा 6-4, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित पुण्याच्या श्रावी देवरेने चौथ्या मानांकित प्रार्थना खेडकरचा 6-1, 5-7, 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित तनिश पाटील व स्मित ऊंद्रे यांनी महाराष्ट्राच्या वेदांत जोशी व तामिळनाडूच्या तेजस होल्ला यांचा 6-2, 7-5 असा तर, दुसऱ्या मानांकित वीर चतुर व सर्वज्ञ सरोदे यांनी हृषव रावळ व रौनक सेठी यांचा 6-4, 7-6(4) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.