आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; आता हायकोर्टात घ्यावी लागणार धाव

मुंबई – क्रुझ वरील मादक द्रव्याच्या संबंधात अटक करण्यात आलेला आर्यन खान याचा जामीन अर्ज एनडीपीएस कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानला आता हायकोर्टात धाव घ्यावी लागणार असून त्याचा निर्णय होईपर्यंत त्याला ऑर्थररोड कारागृहातच राहावे लागणार आहे.

आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या कोर्टाने काल आपला निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

एनडीपीएस कोर्टाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर त्यांचे वकील हायकोर्टात त्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे. पण तोपर्यंत तरी आर्यनला कारागृहाच्या कोठडीतच राहावे लागणार आहे.

आर्यन हा अभिनेता शाहरूख खानचा मुलगा असून या हायप्रोफाईल केसकडे संपूर्ण देशातील मीडियाने लक्ष केंद्रित केले आहे. 3 ऑक्‍टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रुझवर एनसीबीने छापा घालून ही कारवाई केली होती.

तेव्हापासून आर्यन खान हे अटकेत आहे. त्याच्यावरील कारवाई बनावट असल्याचा दावा राज्याचे एक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हा बनाव रचण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते व त्यासंबंधातील काही व्हिडिओ पुरावेही त्यांनी सादर केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.