मुंबई, – ड्रग्ज केस प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मुदतवाढ मिळणार का?, यावर न्यायालयात उद्या, गुरूवारी निर्णय देण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीचा तपास सुरू असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनडीपीएस न्यायालयाकडे केली आहे.
याप्रकरणी एनसीबीतर्फे ऍड. अद्वैत सेठना यांनी बुधवारी युक्तिवाद केला. याप्रकरणी तपास यंत्रणेने जमा केलेले सर्व नमुने तपासणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ज्यातील सर्व 17 नमुने सायकोट्रॉपिक ड्रग चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ तपास योग्य मार्गाने सुरू आहे, यात एकूण 69 साक्षीदारांचा जावाब आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. 10 स्वतंत्र साक्षीदारांचा जावाब ही नोंदवला गेला असून अन्य 4 जणांचा जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे.
याशिवाय 19 संशयितांचा जावाब नोंदविण्यात आला असून अन्य 15 संशयितांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी एनसीबीतर्फे करण्यात आलीय. मात्र याला या प्रकरणात अजूनही न्यायालयीन कोठडीत असलेले दोन आरोपी अब्दुल कदल शेख आणि चॅनेडू इगवे यांच्या वतीने विरोध करण्यात आला.
दरम्यान, एनडीपीएस कायद्यातील कलम 36A(4) प्रमाणे 180 दिवस संपायच्या आधीच ही मुदतवाढ मागण्यात आली. येत्या शनिवारी ही मुदत संपणार आहे. याप्रकरणी एसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली होती. ज्यापैकी 18 सध्या जामीनावर असून तस्करीच्या आरोपात अटक झालेले दोन परदेशी नागरीक अद्याप कारागृहात आहेत.