मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज प्रकरणात न्यायालयाकडून आजही कोणता दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे.
सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात करोनाशी संबंधित शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन सरकारी वकील आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचेही सांगितले जात आहे. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केल्यानंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असे म्हणत टोला लगावला.
दरम्यान, याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचं सांगत ही याचिका फेटाळली होती.
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.