मुंबई – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्याची प्रमाणित प्रत वेळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला. यामुळे आर्यन खानला आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.
आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला आजही तुरुंगातच राहावे लागणार आहे. आता आर्यन खानची उद्या, शनिवारी सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी दिली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने भूमिका बजावली.
मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस कोर्ट सुटकेचे आदेश जारी करते. हायकोर्टाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची आणि जमानतीची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात.
दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान गेल्या 26 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता. पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. त्यामुळे आर्यन खान आज तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा असला तरी त्याची प्रत वेळेत पोहोचला नसल्याने त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे.