पुणे – कॅडेलिया क्रुझ पार्टी दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोबत सेल्फी घेणारा, या प्रकरणात एनसीबीचा साक्षिदार असणाऱ्या किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज-मांगडेवाडी येथील एका लॉजमधून पहाटे साडेतीन वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान सोमवारी पुणे पोलिसांचे एक पथक त्याचा माग काढत लखनौमध्ये गेले होते. तेथून त्याने पोलिसांना गुंगार देत पळ काढला होता.
गोसावी मागील काही दिवस वृत्त वाहिण्यांच्या संपर्कात होता. तो सातत्याने वृत्त वाहिण्यांना बाईट देत शरण येत असल्याचे सांगत होता. मात्र ही शरणागती महाराष्ट्राबाहेर पत्करणार असल्याचे जाहिर केले होते. त्याच्या मागावर पुणे पोलिस आणी गुन्हे शाखेची पथके होती. त्याला अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) रामनाथ पोकळ, उपायुक्त(गुन्हो) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस उपायुक्त लक्ष्मण बोऱ्हाटे उपस्थित होते.
दरम्यान, किरण गोसावी विरोधात फसवणूक प्रकरणी फिर्यादी चिन्मय देशमुखने फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 रोजी तक्रार दाखल केली होती. त्याने किरण गोसावीकडे पैसे मागण्यासाठी फोन केल्यावर गोसावीने त्याला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती. सध्या शिवजयंतीची तयारी सुरु असल्याने बिझी आहे. नाहीतर तुला बघुन घेतले असते अशी धमकिही दिली होती. इतकेच नव्हे तर तु पीएम किंवा सीएमला आण सगळ्यांना आत टाकेन , मला काय फरक पडत नाही असेही म्हटला होता. याचे रितसर रेकॉर्डींग फिर्यादीकडे आहे. यामुळे गोसावीवर फसवणूकनंतर धमकी देण्याचा आणखी एक गुन्हा दाखल होऊ शकतो. ही कामगिरी खंडणी विरोधी पथक एकने केली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार संजय भापकर आणी चव्हाण सहभागी झाले होते.