अरविंद सावंत यांचा केंद्रीयमंत्री पदाचा राजीनामा मंजूर

केंद्रातील एनडीए सरकारमधून शिवसेना बाहेर

नवी दिल्ली – महाराष्ट्रात भाजप प्रणित आघाडीशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रातील एकमेव कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होत असताना केंद्रातील सत्तेत राहण्यात काही अर्थ उरला नाही, कारण एनडीएशी आता आमचे विश्‍वासाचे नाते राहिलेले नाही असे नमूद करीत त्यांनी आज पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली होती. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अखेर अरविंद सावंत यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सावंत यांच्याकडे अवजड उद्योग हे खाते होते. या मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला आहे. त्या राजीनामा पत्राची प्रतही त्यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केली. आता शिवसेनेने भाजपशी युती तोडली आहे काय असे विचारता ते म्हणाले की जेव्हा मी राजीनामा देतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हीच ओळखा असे ते म्हणाले. निवडणुकीपुर्वी भाजपने 50-50 फॉर्म्युला मान्य केला असताना आणि जनादेश आमच्या युतीच्या बाजूने असताना त्यांनी ते अमान्य करणे अयोग्य होते असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. महाराष्ट्रान नव्या समिकरणाचे सरकार स्थापन होत असताना मी केंद्रातील सरकारमध्ये राहणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरत नाही असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.