तिसऱ्यांदा रामलीला मैदानावर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल येत्या रविवारी, 16 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातील ट्विट केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत 62 जागांवर विजय मिळवला. मतमोजणीपूर्वी आम्हीच सत्तेत येणार असा दावा करणाऱ्या भाजपला सलग दुसऱ्यांदा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला आमदारांची दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भाजपचे केवळ 8 आमदार निवडून आले आहेत. 2015 मधील निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागांवर विजय मिळाला होता.
दिल्लीतील विधानसभा निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्याभोवतीच फिरली. प्रचारात भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्यावरच निशाणा साधण्यात आला. आम आदमी पक्षाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्लीतील नागरिकांसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या. त्याचबरोबर मोफत प्रवासाचे काही निर्णय महिलांसाठी घेण्यात आले. त्याचाही फायदा आपला निवडणुकीत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील निवडणुकीत कॉंग्रेसलाही नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. कॉंग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. गेल्यावेळीही दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता.