नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या (शनिवार) तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधातील लढ्यात केजरीवाल यांना केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या रूपाने आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीतील सेवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारने एक अध्यादेश आणला. त्या अध्यादेशाशी निगडीत विधेयकाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी केजरीवाल विरोधी पक्षांपर्यंत पोहचत आहेत.
याआधी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या सर्वांनी केजरीवाल यांना पाठिंब्याची ग्वाही दिली. आता केजरीवाल कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठीही उत्सुक आहेत.