Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आम आदमी पक्ष (आप), भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहेत. यातच आता ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
यमुना नदीची स्वच्छता, पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करणे आणि दिल्लीचे रस्ते युरोपीयन रस्त्यांसारखे करणे ही आश्वासने पूर्ण करता आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मीबाई नगर येथील निवडणुकीच्या रॅलीमध्ये बोलताना केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच, पुन्हा सत्तेत आल्यास दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रचारसभेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘मी माझ्या आश्वासनांच्या प्रती खरा आहे. एकतर मी दिलेली आश्वासने पूर्ण करेल. नाही तर मी आश्वासने पूर्ण करू शकलो नाही याची आठवण करून देईल. यमुना नदी स्वच्छ करणे, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि दिल्लीचे रस्ते युरोपियन रस्त्यांसारखे करणे, ही आश्वासने पूर्ण करू शकलो नाही.‘ पुन्हा सत्तेत आल्यापासून 5 वर्षात ही सर्व आश्वासने पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’कडून मतदारांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. ‘आप’कडून महिन्याला 200 युनिट मोफत वीज, मोफत पाणी, मोफत उपचार आणि महिलांसाठी बसमध्ये मोफत बस प्रवास अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना दरमहिना 2100 रुपये दिले जातील. तसेच, संजीवनी योजनेंतर्गत 60 वर्षांपुढील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा देण्यात येईल, अशी घोषणा ‘आप’ने केली आहे.