गुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढवणार – अरविंद केजरीवाल यांची घोषणा

अहमदाबाद – आम आदमी पक्षाच्या गुजरातमधील कार्यालयाचे आज या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उद्‌घाटन केले. या उद्‌घाटनाच्यावेळीच केजरीवालांनी पुढील वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात गुजरात राज्य बेवारस स्थितीत सोडून दिल्या सारखी स्थिती होती. गुजरातला कोणी त्राताच उरलेला नाही अशी स्थिती या काळात येथील जनतेने अनुभवली असे ते म्हणाले.

आज गुजरातमधील अनेक युवक बेरोजगार झाले असून अनेक मुलांना शाळा कॉलेजात प्रवेशही मिळेनासा झाला आहे. या राज्यातील व्यापारी धास्तावलेला असून शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे असा आरोपी केजरीवाल यांनी केला.

आज झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात गुजरातमधील लोकप्रिय पत्रकार व न्युज अँकर इशुधन गढवी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांचे केजरीवालांनी स्वागत केले. केजरीवालांनी यावेळी भाजपबरोबरच कॉंग्रेसवरही टीका केली.

ते म्हणाले की गुजरातमधील कॉंग्रेस भाजपच्या खिशात आहे. या दोन्ही पक्षांना गुजरातचा गेल्या 70 वर्षात खरा विकास करताच आलेला नाही असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की गुजरातमधील शाळा आणि सरकारी रूग्णालयांची आज अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.