नवी दिल्ली : येथील मुनदका औद्योगिक वसाहतीतील बॅटरी कारखान्याला आग लागून नंतर झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळून त्याखाली सापडल्याने अग्नीशामक दलातील एका जवानाचा मृत्यू झाला. तर अन्य 14 जण जखमी झाले. या इमारतीतून 18 जणांची सुटका राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्नीशामक दलाच्या जवानांनी केली. दरम्यान, मरण पावलेल्या जवानाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कोटीची मदत जाहीर केली आहे.
मरण पावलेल्या जवानाचे नाव अमित बल्यान (वय 20) असे आहे. बल्यान यांनी दिल्लीकरांच्या सेवेसाठी आपले प्राण सोडले. आपली गेलेल्या व्यक्तीला परत आणता येत नाही. मात्र दिल्ली सरकार बल्यान यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत देत आहे. समजासाठी आपण येवढे तरी करू शकतो, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
पहाटे या बॅटरी बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. ती वेगाने पसरली. त्यावेळी अग्नीशामक दलाने तातडीने सात बंब पाठवले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कारखान्यातील रसायनांचा स्फोट झाला. त्यात कारखान्याची इमारत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. त्यांचा नेमका तपशील उपलब्ध होत नव्हता. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला मदत कार्यासाठी पाठवण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्नीशमन दलाचे या इमारतीत अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु केले. जखमींना पश्चिम विहार येथील नजिकच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाचे 35 बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. तेथे झालेल्या स्फोटात अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक जण अडकले आहेत.
पहाटे 4 वाजून 23 मिनिटांनी उद्योगनगरमधील पीराग्रही भागातील कारखान्याला आग लागली असल्याचा फोन आला. त्यावेळी सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले,असे दिल्ली अग्नीशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले. मात्र आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना तेथे स्फोट झाला. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह काही जण अडकले.