वाघोली – वाघोलीतील जेड रेसिडेन्सीमध्ये कुटुंबासह वास्तव्यास असणारा आरुष वर्मा याची फास्टेस्ट किड्स म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. सिनियर केजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्याने अवघ्या २ मिनिट ३९ सेकंदात १०० इंव्हेंटर्स (शोधकर्ता) ची नावे सांगितली आहेत. त्याचबरोबर ग्लोबल रेकॉर्ड्स व रिसर्च फौंडेशनमध्ये देखील त्याची नोंद घेण्यात आली आहे.
वाघोली येथील इंडो स्कॉट्स स्कूलमध्ये सिनियर केजीत शिकणारा आरुष वर्मा लहानपणापासून चौकस वृत्तीचा असून गोष्टी पटकन ध्यानात ठेवतो. त्याचे लक्षात ठेवण्याचे कौशल्य आणि विज्ञान विषयाची आवड थक्क करणारी आहे. ५ वर्ष ३ महिन्याचा असताना त्याने एका मिनटात ३९ सायंटीस्ट (शास्त्रज्ञ) व त्यांच्या इंव्हेंटर्स माहिती सांगितल्याने ग्लोबल रेकॉर्ड्स अँड रिसर्च फौंडेशनमध्ये त्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ५ वर्ष ८ महिन्यांचा असताना याच कामगिरीत उच्चांक गाठत १०० इंव्हेंटर्सची नावे अवघ्या २ मिनिट ३९ सेकंदात सांगितल्याने त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.
याच विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर रेकॉर्ड करण्यासाठी सध्या आरुष तयारी करीत आहे.
आरुष वर्माचे वडील शरद वर्मा नामांकित कंपनीत नोकरी करत आहेत तर आई मीनाक्षी वर्मा ह्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहेत. त्याच्या यशामध्ये त्याच्या कुटुंबियाची मोलाची साथ लाभत आहे.